Tuesday, January 24, 2012

नकारघंटा

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असे म्हंटले जाते. अनुवंशिकता, संस्कार, सभोवतालची परिस्थिती आणि जीवनात येणारे प्रसंग यावर माणसाचा स्वभाव तयार होतो. त्यामुळे काही लोक बहिर्मुखी असतात, तर काही अंतर्मुखी. तसेच काही लोक विचारी, तर काही लोक फटकळ स्वभावाचे असतात. त्याप्रमाणे कुणी कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करणारे असतात, याउलट काही जण कायम नकारात्मक विचार करतात. अमुक एक काम होणारच नाही अशी त्यांची धारणा असते. साहजिकच ते स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात आणि इतरांचाही आत्मविश्वास डळमळीत करतात.

एका शासकीय कार्यालयात एका कर्मचाऱ्याला प्रत्येक वाक्याला सारखे "नाही" हा शब्द उच्चारण्याची सवय असल्याने त्याचे वाक्य "नाही, त्याच असं आहे बऱ का", किंवा "नाही, मी काय म्हणतो" अशा पद्धतीने सुरु होते. साहजिकच समोरचा माणूस गोंधळून जातो. कारण "नाही, तुमचं काम होईल, नाही का ?" या वाक्याचा अर्थ काय घ्यावा असा प्रश्न अन्य लोकांना पडतो.

एका महत्वाच्या बैठकीत त्यांनी असं "नाही, मला असं वाटते की" वैगेरे वैगेरे "नाही"चे पालुपद लावले. तेव्हा वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "अहो बाबुराव, तुम्ही 'नाही' म्हणू नका, 'हो' म्हणा म्हणजे सकारात्मक बोलत चला." त्यावर बाबुराव उदगारले, "नाही, मला तेच म्हणायचे आहे" त्यावर वरिष्ठ चांगलेच भडकले. आणि म्हणाले "अहो तुम्हाला किती वेळा सांगायचे 'नाही' हा शब्द टाळा". तरी बाबुरावांच्या तोंडचा 'नाही' हा शब्द काही टळत नव्हता. यामुळे अन्य अधिकारीही वैतागले.

त्यावर एक सहकारी म्हणाला, "जाऊ द्या ना साहेब, बाबुरावांची कोणाचेही काम होणार नाही अशा अवघड जागी नियुक्ती केली आहे. तेव्हा त्यांची प्रत्येकाचे काम होईलच अशा जागेवर बदली करा म्हणजे त्यांची नकारघंटा आपोआप बंद होईल." त्यावर बाबुराव म्हणाले, "नाही, अगदी बरोबर आहे. साहेब !" त्यांच्या पुन्हा "नाही" या शब्दाने साहेबांनी कपाळावर हात मारून घेतला.

Monday, January 23, 2012

मन

कधी कधी प्रश्न पडतो, मन हे काय असतं? मन हे आपलंच... न दिसणारं प्रतिबिंब असतं. त्यात उन्हाळ्यातील तप्त उन्हाच्या वेदना असतात, पावसाळ्यातील स्वप्नसरी असतात, हिवाळ्यातील आठवणींचा गारवा असतो..... आणि ते असतं तरी केवढं?.. शरीराच्या इंचा दोन इंचाच्या भागात न बसणारं असतं. शरीराचा महत्वाचा भाग हाच असतो. कोणाचं चांगलं, तर कोणाचं वाईट असतं. पण प्रत्येकाला ते चांगलंच वाटत असतं. कधी ते आत्मविश्वास देतं, तर कधी विश्वासघात करतं. त्यात नेहमी काहीतरी शिजत असतं. ते नेहमी भरकटत असतं.

मन कधी घाबरट असतं. मन कधी ताकदवानही असतं. मन कधी कधी चुकतं, आणि चुकत चुकत शिकतं. मनाची बाजू नेहमी जास्त असते; ते अप्रत्यक्षपणे नेहमी चुका करतं. मन हे स्थिर नसतं, मन कधी कधी एकाग्र होत नाही. मन निष्काळजी असतं. मनाला कधी कधी एकटं रहावसं वाटतं. मनाला कधी एकत्र राहावंसं वाटतं, मनाला कधी वाटतं भरपूर पैसा मिळावा. मनाला कधी वाटतं. मनाला कधी वाटतं नेहमी गरीब राहावं, काय करायचं एव्हढा पैसा असल्यावर, मनाला सगळं आयतं हवं असतं. मनाला हवं असणारं पण प्रत्यक्षात, वेगळं झाल्यावर तडजोडही मनच करत असतं. वर्तमान, भूत व भविष्य यात मन नेहमी फिरत असतं.

ह्या विश्वामध्ये निसर्गाने अशी एकच भाषा बनवली आहे, की ती फक्त मनुष्याला स्वतःची, स्वतःला ऐकू येईल. तो कितीही ओरडला तरी ती भाषा कोणाला ऐकू जाणार नाही. ती भाषा म्हणजे मनाची भाषा. ती तेव्हाच समजते जेव्हा शरीर आपले हावभाव स्पष्ट करते आणि ते हावभाव ओळखायलासुद्धा मनच असावे लागते.

मन माझे, माझे अस्तित्व, दाखवून गेले, क्षणार्धात.
मन माझे, माझे स्वप्न, उद्ध्वस्त करून गेले, क्षणार्धात.
मन माझे, जाणिव 'तिची', करून गेले, क्षणार्धात.
मन माझे, माझ्या आठवणी, हसवून गेल्या, क्षणार्धात.
मन माझे, भाषा प्रीतीची, शिकवून गेले, क्षणार्धात.
मन माझे, विखुरलेले, नाते जडून गेले, क्षणार्धात.
मन माझे, क्षितीज नसणारे, माझ्याच जवळ असणारे, क्षणार्धात.
मन माझे, एक फुलपाखरू, उडतसे सारखे, क्षणार्धात.
मन माझे, वाट शोधणारे, न मिळाल्यास स्वतः तयार करणारे, क्षणार्धात.

Wednesday, October 5, 2011

इन्स्पेक्शन

रोजच्यासारखीच प्रार्थना, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो पुढल्या आठवडयात शाळेचे इन्स्पेक्शन होतेय तेव्हा मी काय काय सूचना देतो त्या नीट ध्यानात घ्यायच्या..

सूचना क्र. १ - प्रत्येकाने आपापला गृहपाठ पुरा करायचा.

मी ताडकन उभा राहिलो अन म्हणालो गुरुजी.... माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो!
घरी जायचे.. पाठीवरचे दप्तर फेकायचे..
मायीनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपलीतली चतकुर भाकर कोरडीच पोटात ढकलायची.
हातामध्ये इळा घ्यायचा आणि शिवारभर फिरायचे.
माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचे..
तिच्या पोटाला बिलगायचे.. तिच्या पदराआड दडायचे.. आणि चतकुर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी पोटभर रडायचे !!!
तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओठावर ओठ टेकवायची
दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीवाणी माझं पोट तट्ट व्हायचं गुरुजी !!
पुन्हा हातात इळा घेतो आणि शिवारभर कुपाट्यांनी फिरतो
संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्याकुट्या गोळा करत..
पोरं हासली.. मी खाली बसलो..

सूचना क्र. २ - शाळेच्या भिंतींना रंग द्यायचाय. प्रत्येकाने गटागटाने मदत करायची !

मी पुन्हा उभा राहिलो. म्हणालो, गुरुजी कशापायी त्या निर्जीव भिंतींना रंग देताय ?
इथं जित्या माणसांचा रंग टिकत नाही तर भिंतींचे कुठून टिकतील गुरुजी !
माझ्याच माय-बापाचं घ्या ना
माझी नक्षत्रावाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून काळी ठिक्कर पडली
आणि दुसऱ्यांचे बोजे वाहताना माझा बाप मेरावरच्या बाभळीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी..
तुम्हाला द्यायचाच असल रंग त्या भिंतींना तर माझं काही म्हणणं नाही..
पण एक सांगून ठेवतो गुरुजी.. त्या काळ्या विठ्ठलाच्या पायावर डोकं आदळून आदळून माझ्या मायबापानं रक्ताचा लाल रंग दिला पण तो विठू कधी पावला नाही.
तर ह्या दोन कवडीच्या रंगानं हा तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी ?

सूचना क्र. ३ - त्या दिवशी प्रत्येकानं नवा युनिफॉर्म घालून यायचं..

माझ्या डोळ्यात पाणी.. मी उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी
माझ्या मायीच्या अंगावरचं लुगडं चार ठिकाणी इरलय..
ते सांधायला धोंदुक मिळालं नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळल ?
गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये..
मी म्हणालो, गुरुजी.. घरात इस्त्री सुद्धा नाही तेव्हा मास्तर जाम भडकले,
हातामध्ये दप्तर दिले.. पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं..

मी तसाच रडत-रडत घरी गेलो.. मायीला हुडकल.. तिच्या पोटाला बिलगलो..
तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोटभर रडलो..
पुढं मायीनं पोटाला पीळ देऊन इस्त्री घेऊन दिली ! मायीच्या रक्तानं माझ्या
कपड्यांना इस्त्री करून माझं इन्स्पेक्शन साजरं झालं..
पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं.. गुरुजींचं झालं..
माझं झालं की मायीचं झालं हे तेव्हा कधीच कळलं नाही..

पण आता सारं कळतंय.. मायीच्या पोटातला एक-एक पीळ उलगडतोय..
त्यामुळेच कोपऱ्यात पडलेली तीच इस्त्री मी महिनोंमहिने उचलत नाही.. माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी..
कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात
आणि पहिले दिवस आठवले की, गोठ्यातल्या गायीसारखे
माझे डोळे पुन्हा-पुन्हा पाणवतात........ !!

Saturday, October 1, 2011

स्लॅमबुक

माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात स्लॅमबुक लिहिण्यासारखे दुसरे किचकट काम केले नाही. मुलांची स्लॅमबुक लिहिण्याची त~हाच वेगळी असते. सरळसोट उत्तरं कोणीच देत नाही. नाव, पत्ता, फोन नंबर इथपर्यंत गाडी व्यवस्थित असते. टोपण नाव लिहिण्याची वेळ आली की, छोट्या, गोटया, पिंटू, पिंट्या, चिंट्या या घरगुती नावांपासून सच्या, दिन्या, राक्या, शेख शकील, जाड्या इत्यादी कॉलेजमध्ये फेमस असलेली नावे लिहितात.

यानंतर आवडता,,,, मित्र नाही हो. मैत्रिणीबद्दल ! सर्वात आधी ज्याचं स्लॅमबुक आहे त्याचं नाव लिहिण्याची प्रथा पाळावी लागते. पण आमच्यासारख्यांना मैत्रिणी नाहीत म्हणून जड अंतःकरणाने आडवी रेघोटी मारून ती जागा मोकळी सोडावी लागते.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण याबद्दल लिहिण्यासारखे बरेच काही असते. शाळेत कोण्या एके काळी पाटील सरांनी कानाखाली आवाज काढलेला असतो, हेड मास्तरांकडून पालकांना बोलवण्याची चिठ्ठी लिहून घेतली जाते, नाही तर काही प्रेमभंग लिहितात.

आवडता रंग या कॅटेगरीत पर्शियन ब्लू, रॉयल ब्लू पासून चिंतामणी कलर, राणी कलर नाही तर माझ्या मैत्रिणीचा जो आवडता कलर आहे तो इथपर्यंत रंगांची उधळण असते. आवडत्या गाण्यांमध्ये सर्वकाही अलाउड असते.

काय पाळायला आवडतं ? याबद्दल स्वच्छता आणि शांतता असं लिहिण्याऐवजी प्राण्यांचीच नावे लिहितात जसे कुत्रा, मांजर, कोंबडी इत्यादी. आवडता लेखक विल्यम शेक्सपीअर असे लिहावे. (भले मग तुमचे इंग्रजीतील मार्क ४० च्या वर गेले नसतील तरी चालेल.) वाचणाऱ्याला वाटले पाहिजे की आपलं इंग्रजी किती हायफाय आहे ते ! मराठीत गोडी असेल तर अत्रे, देशपांडे, सावंत यांना स्थान द्यावे. आवडती डिश या गटात कारल्याची भाजी, फालुदा, चिकन च्याव च्याव, मटण म्याव म्याव इत्यादी.

पुढे काय व्हायचंय याबद्दल लिहायचं म्हंटल की, आपले फिल्ड सोडून पंतप्रधान, लालू, सिंगर व्हायचंय असं बिनधास्त लिहावे. जर पुढे अदृश्य होऊन जगायची इच्छा असेल तर मिस्टर इंडिया, गायबलेला तुषार कपूर असंच लिहावं. मैत्रीबद्दल अभिप्राय देताना ये शोले की दोस्ती है , याराना बहुत गहरा है वैगेरे थोडसं सेंटी मारून सांगता करावी. शेवटी फोटो चिकटवतांना मोस्ट वॉन्टेडला शोभेल असा फोटो लावावा आणि खाली नेक्स्ट म्हणून स्लॅमबुक बंद करावे.

Wednesday, September 28, 2011

अंतर्बाह्य - ७

* मी जेव्हा चौदा वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील इतके अडाणी होते की त्यांच्याबरोबर माझे खूप कमी वेळा पटायचे. परंतु जेव्हा मी एकोणावीस वर्षाचा झालो, तेव्हा मला याचे आश्चर्य वाटले की, पाच वर्षानंतर ते मला कितीतरी गोष्टी शिकवून गेले होते.

* तुम्ही जर कडयावर उभे नसाल तर, तुम्ही फार जास्त जागा वापरत आहात.

* तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट योग्यच करायची असेल तर; तर तुम्ही फार काही करू शकणार नाही.

* जहाज हे बंदरातच जास्त सुरक्षित असते; पण ते बंदरात उभे करून ठेवण्यासाठी बनवले जात नाही.

* महाविद्यालये म्हणजे अशी ठिकाणे की, जिथे गोटे घासूनपुसून लख्ख केले जातात आणि हिऱ्यांना निस्तेज केले जाते.

* चांगल्या पुस्तकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही किती वाचलीत हे महत्वाचे नाही; तर किती तुमच्या अंतरंगात उतरली, ते महत्वाचे आहे.

* नेता आणि बॉस यांमधील फरक लोक विचारतात. नेता नेतृत्व करतो आणि बॉस 'हाकतो'.

* तज्ज्ञाच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन काम करण्याची हिंमत आपल्यात असायला हवी.

* देवा, माझ्या शत्रूंवर दया कर; कारण मी ती करणार नाही.

* खाली आपटल्यावर तुम्ही उसळी मारून किती उंच जाऊ शकता, ते म्हणजे यश.

अंतर्बाह्य - ६

* चांगला अंदाज बांधण्याची क्षमता अनुभवातून येते आणि अनुभव हा वाईट अंदाजातून येतो.

* तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असायलाच हवे तरच तुम्ही तुमच्या स्पर्धकांना चीत करू शकाल.

* उत्साह ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता आहे. ती पैसा, ताकद आणि प्रभाव यांना मागे टाकते.

* प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्तरित्या समजावून सांगणे शक्य होईल; पण त्यामधून काहीच साध्य होणार नाही. त्याला काही अर्थ नसेल. म्हणजे बीथोवनची सुरावट नागमोडी दाबपट्ट्याचा एक प्रकार म्हणून वर्णिल्यासारखे होईल.

* तो इतका विद्वान होता की, नऊ भाषांमध्ये घोडयाला काय म्हणतात हे तो सांगू शकायचा आणि इतका मूर्ख होता की, स्वार होण्यासाठी त्याने गाढव खरेदी केले.

* कॉलेजच्या पदवीमुळे तुमच्या कानांची लांबी कमी होत नाही तर, ते फक्त झाकले जातात.

* फक्त साहसादरम्यानच काही लोक स्वतःला ओळखण्यात यशस्वी होतात.

* कोणाच्याही मार्गावर मैलभरपर्यंत त्याचे जोडे घालून, थोडेसे चालून बघितल्याशिवाय त्या व्यक्तीवर टीका करू नका. या पद्धतीमुळे तुमचे म्हणणे जरी त्याला पटले नाही, तरी काही हरकत नाही; कारण तुम्ही त्याच्यापासून मैलभर दूर असाल आणि तुमच्याकडे त्याचे जोडेही असतील.

* मुले मोठया माणसांचे कधीही नीट ऐकत नाहीत; पण ती त्यांची नक्कल मात्र पुरेपूर करतात.

* मला टी. व्ही. हे फार चांगले शैक्षणिक मध्यम वाटते. ज्या क्षणी घरातील कोणी टी.व्ही. सुरु करतो, त्या क्षणी मी लगेच एखादे पुस्तक घेऊन वाचत बसतो.

अंतर्बाह्य - ५

* कधी कधी एक घटना तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकू शकते.

* वाचन हा प्रेरणेचा आणि शिकण्याचा स्त्रोत होऊ शकतो.

* सृजनशीलता हा व्यक्ती स्वातंत्र्याचा परिमल आहे.

* विद्वान लोक हे काही नव्या कल्पनेमुळे पुढे जात नाहीत किंवा प्रेरित होत नाहीत; तर आधी सांगितलेल्या गोष्टी पुरेशा नाहीत, या कल्पनेचेच त्यांना वेड असते.

* चोरसुद्धा चोऱ्या करताना कल्पकता वापरतात. धूर्त, युक्तीबाज लोकही खूपच सृजनशील आणि कल्पक असतात; खरे तर सर्वाधिक. ते सुरक्षा व्यवस्थेतील कच्चा दुवा शोधून काढतात, जो त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनाही माहित नसतो.

* ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही, असे आपल्याला वाटते; त्याच आपण केल्या पाहिजेत.

* तुम्हाला जर तुम्ही अचूक असण्याची काळजी नसेल, तर बुद्धिमान होणे सोपे असते.

* अचूक आणि जवळजवळ योग्य शब्द यांमधील फरक म्हणजे वीज आणि काजवा यांतील फरक.

* स्वतःचा अभिमान आणि अहंकार जे पुन:पुन्हा पणाला लावू शकतात, ते अशा गोष्टी करू शकतात, ज्या करण्याची इतरांना गरज वाटत नाही.

* मला एकच गोष्ट माहित आहे की, मला काहीही माहित नाही.