Saturday, August 27, 2011

ऋणानुबंध

माणसाचे आयुष्य म्हणजे अनेक नात्यांची गुंफण! प्रत्येक नात्याचे कर्तव्य वेगळे आणि अधिकारही वेगळे!
त्यातली काही नाती नाजूक व हवीहवीशी वाटणारी! तर काही नाती कर्तव्य म्हणून पार पाडली जाणारी. या नात्यांमध्ये माणसाचं जीवन विभागलेलं! पण रक्ताच्या सर्व नात्यांइतकच जवळचं वाटणारं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान असणारं नातं म्हणजे मैत्रीचं..!

खरंच मैत्रीचा उदय म्हणजे एक नित्य नवा अनुभव आहे. हृदयाच्या मंदिरात, भावनेच्या जलावर, प्रेमाच्या वेलीवर सदैव फुलणारे फुल म्हणजे मैत्री होय. किती सहज आणि सोप्या शब्दात मैत्रीचा खरा अर्थ आपणास अनुभवास मिळतो. आपण मैत्री करतो, पण ती कुठपर्यंत निभावतो; कारण नुसतं मैत्री करून चालत नाही, तर त्या मैत्रीत असणारी निरागसता जपावी लागते. मैत्री हे एक फुल आहे. त्या फुलाच्या पाकळ्या जितक्या फुलवाव्या तितक्या फुलतात; पण त्या फुलाच्या पाकळ्या पडू न देणं हे खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे.

मैत्री ही कशी, कोणाशी होईल ते सांगता येत नाही. मैत्री ही निरागस, निस्वार्थी असावी. तिला स्वार्थ या शब्दाची सांगड नसावी. नाही तर ती जितक्या लवकर जुळते, तितक्या लवकर तुटते सुद्धा. अंधाराच्या उगमासाठी प्रकाशाची पूजा करावी लागते. तसेच मैत्रीत भावनेची पूजा करावी लागते. मैत्रीत जे सर्व देता येईल ते द्यावं आणि जे घेता येईल ते घ्यावं. मैत्रीत सर्व काही दिले तरी सर्व काही आपल्याजवळ उरते. कारण मैत्रीत फक्त देहात फरक असतो. मनात फरक नसतो. आपल्या मैत्रीत विश्वास असावा आणि तोही दगडांमधून वाहणाऱ्या, खळखळणाऱ्या झऱ्यासारखा.

एकमेकांवर असलेली मायेची खात्री म्हणजे आपली खरी मैत्री.. मैत्रीत वादविवाद असावेत. पण गैरसमज नसावेत. वादविवादाने मैत्रीत एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मैत्री आणखीनच घट्ट होण्यास मदत होते. मैत्रीत भावनांची कदर करावी. उणे-दुणे, राग, तिरस्कार सारख्या शब्दांना मैत्रीत थारा नसावा.

दुःखात मनात सावरणारं आणि सुखात सहभागी होणारं, अडचणींमध्ये दिशादर्शन करणारं, तर आवेगाला वेळीच भान आणून देणारं मैत्र आपल्याला अपेक्षित असतं. या सगळ्याच बाबी एकाच व्यक्तीमध्ये पूर्णांशाने असतात, असं नाही; तरीही त्यातल्या अन्य बाबी एका सुहृद मनाला कुठेतरी त्या मैत्रीशी बांधून ठेवीत असतात.

अशी ही मनाच्या कप्प्यात जपून ठेवावी अशी मैत्री. शब्दशब्दाने, स्नेहाच्या भावनेने फुललेली, मोहरलेली, निखळ आनंदाचा झरा असलेली मैत्री चिरंतन बहरत राहावी..

No comments:

Post a Comment