Wednesday, October 5, 2011

इन्स्पेक्शन

रोजच्यासारखीच प्रार्थना, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो पुढल्या आठवडयात शाळेचे इन्स्पेक्शन होतेय तेव्हा मी काय काय सूचना देतो त्या नीट ध्यानात घ्यायच्या..

सूचना क्र. १ - प्रत्येकाने आपापला गृहपाठ पुरा करायचा.

मी ताडकन उभा राहिलो अन म्हणालो गुरुजी.... माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो!
घरी जायचे.. पाठीवरचे दप्तर फेकायचे..
मायीनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपलीतली चतकुर भाकर कोरडीच पोटात ढकलायची.
हातामध्ये इळा घ्यायचा आणि शिवारभर फिरायचे.
माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचे..
तिच्या पोटाला बिलगायचे.. तिच्या पदराआड दडायचे.. आणि चतकुर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी पोटभर रडायचे !!!
तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओठावर ओठ टेकवायची
दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीवाणी माझं पोट तट्ट व्हायचं गुरुजी !!
पुन्हा हातात इळा घेतो आणि शिवारभर कुपाट्यांनी फिरतो
संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्याकुट्या गोळा करत..
पोरं हासली.. मी खाली बसलो..

सूचना क्र. २ - शाळेच्या भिंतींना रंग द्यायचाय. प्रत्येकाने गटागटाने मदत करायची !

मी पुन्हा उभा राहिलो. म्हणालो, गुरुजी कशापायी त्या निर्जीव भिंतींना रंग देताय ?
इथं जित्या माणसांचा रंग टिकत नाही तर भिंतींचे कुठून टिकतील गुरुजी !
माझ्याच माय-बापाचं घ्या ना
माझी नक्षत्रावाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून काळी ठिक्कर पडली
आणि दुसऱ्यांचे बोजे वाहताना माझा बाप मेरावरच्या बाभळीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी..
तुम्हाला द्यायचाच असल रंग त्या भिंतींना तर माझं काही म्हणणं नाही..
पण एक सांगून ठेवतो गुरुजी.. त्या काळ्या विठ्ठलाच्या पायावर डोकं आदळून आदळून माझ्या मायबापानं रक्ताचा लाल रंग दिला पण तो विठू कधी पावला नाही.
तर ह्या दोन कवडीच्या रंगानं हा तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी ?

सूचना क्र. ३ - त्या दिवशी प्रत्येकानं नवा युनिफॉर्म घालून यायचं..

माझ्या डोळ्यात पाणी.. मी उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी
माझ्या मायीच्या अंगावरचं लुगडं चार ठिकाणी इरलय..
ते सांधायला धोंदुक मिळालं नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळल ?
गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये..
मी म्हणालो, गुरुजी.. घरात इस्त्री सुद्धा नाही तेव्हा मास्तर जाम भडकले,
हातामध्ये दप्तर दिले.. पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं..

मी तसाच रडत-रडत घरी गेलो.. मायीला हुडकल.. तिच्या पोटाला बिलगलो..
तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोटभर रडलो..
पुढं मायीनं पोटाला पीळ देऊन इस्त्री घेऊन दिली ! मायीच्या रक्तानं माझ्या
कपड्यांना इस्त्री करून माझं इन्स्पेक्शन साजरं झालं..
पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं.. गुरुजींचं झालं..
माझं झालं की मायीचं झालं हे तेव्हा कधीच कळलं नाही..

पण आता सारं कळतंय.. मायीच्या पोटातला एक-एक पीळ उलगडतोय..
त्यामुळेच कोपऱ्यात पडलेली तीच इस्त्री मी महिनोंमहिने उचलत नाही.. माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी..
कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात
आणि पहिले दिवस आठवले की, गोठ्यातल्या गायीसारखे
माझे डोळे पुन्हा-पुन्हा पाणवतात........ !!

Saturday, October 1, 2011

स्लॅमबुक

माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात स्लॅमबुक लिहिण्यासारखे दुसरे किचकट काम केले नाही. मुलांची स्लॅमबुक लिहिण्याची त~हाच वेगळी असते. सरळसोट उत्तरं कोणीच देत नाही. नाव, पत्ता, फोन नंबर इथपर्यंत गाडी व्यवस्थित असते. टोपण नाव लिहिण्याची वेळ आली की, छोट्या, गोटया, पिंटू, पिंट्या, चिंट्या या घरगुती नावांपासून सच्या, दिन्या, राक्या, शेख शकील, जाड्या इत्यादी कॉलेजमध्ये फेमस असलेली नावे लिहितात.

यानंतर आवडता,,,, मित्र नाही हो. मैत्रिणीबद्दल ! सर्वात आधी ज्याचं स्लॅमबुक आहे त्याचं नाव लिहिण्याची प्रथा पाळावी लागते. पण आमच्यासारख्यांना मैत्रिणी नाहीत म्हणून जड अंतःकरणाने आडवी रेघोटी मारून ती जागा मोकळी सोडावी लागते.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण याबद्दल लिहिण्यासारखे बरेच काही असते. शाळेत कोण्या एके काळी पाटील सरांनी कानाखाली आवाज काढलेला असतो, हेड मास्तरांकडून पालकांना बोलवण्याची चिठ्ठी लिहून घेतली जाते, नाही तर काही प्रेमभंग लिहितात.

आवडता रंग या कॅटेगरीत पर्शियन ब्लू, रॉयल ब्लू पासून चिंतामणी कलर, राणी कलर नाही तर माझ्या मैत्रिणीचा जो आवडता कलर आहे तो इथपर्यंत रंगांची उधळण असते. आवडत्या गाण्यांमध्ये सर्वकाही अलाउड असते.

काय पाळायला आवडतं ? याबद्दल स्वच्छता आणि शांतता असं लिहिण्याऐवजी प्राण्यांचीच नावे लिहितात जसे कुत्रा, मांजर, कोंबडी इत्यादी. आवडता लेखक विल्यम शेक्सपीअर असे लिहावे. (भले मग तुमचे इंग्रजीतील मार्क ४० च्या वर गेले नसतील तरी चालेल.) वाचणाऱ्याला वाटले पाहिजे की आपलं इंग्रजी किती हायफाय आहे ते ! मराठीत गोडी असेल तर अत्रे, देशपांडे, सावंत यांना स्थान द्यावे. आवडती डिश या गटात कारल्याची भाजी, फालुदा, चिकन च्याव च्याव, मटण म्याव म्याव इत्यादी.

पुढे काय व्हायचंय याबद्दल लिहायचं म्हंटल की, आपले फिल्ड सोडून पंतप्रधान, लालू, सिंगर व्हायचंय असं बिनधास्त लिहावे. जर पुढे अदृश्य होऊन जगायची इच्छा असेल तर मिस्टर इंडिया, गायबलेला तुषार कपूर असंच लिहावं. मैत्रीबद्दल अभिप्राय देताना ये शोले की दोस्ती है , याराना बहुत गहरा है वैगेरे थोडसं सेंटी मारून सांगता करावी. शेवटी फोटो चिकटवतांना मोस्ट वॉन्टेडला शोभेल असा फोटो लावावा आणि खाली नेक्स्ट म्हणून स्लॅमबुक बंद करावे.