Tuesday, January 24, 2012

नकारघंटा

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असे म्हंटले जाते. अनुवंशिकता, संस्कार, सभोवतालची परिस्थिती आणि जीवनात येणारे प्रसंग यावर माणसाचा स्वभाव तयार होतो. त्यामुळे काही लोक बहिर्मुखी असतात, तर काही अंतर्मुखी. तसेच काही लोक विचारी, तर काही लोक फटकळ स्वभावाचे असतात. त्याप्रमाणे कुणी कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करणारे असतात, याउलट काही जण कायम नकारात्मक विचार करतात. अमुक एक काम होणारच नाही अशी त्यांची धारणा असते. साहजिकच ते स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतात आणि इतरांचाही आत्मविश्वास डळमळीत करतात.

एका शासकीय कार्यालयात एका कर्मचाऱ्याला प्रत्येक वाक्याला सारखे "नाही" हा शब्द उच्चारण्याची सवय असल्याने त्याचे वाक्य "नाही, त्याच असं आहे बऱ का", किंवा "नाही, मी काय म्हणतो" अशा पद्धतीने सुरु होते. साहजिकच समोरचा माणूस गोंधळून जातो. कारण "नाही, तुमचं काम होईल, नाही का ?" या वाक्याचा अर्थ काय घ्यावा असा प्रश्न अन्य लोकांना पडतो.

एका महत्वाच्या बैठकीत त्यांनी असं "नाही, मला असं वाटते की" वैगेरे वैगेरे "नाही"चे पालुपद लावले. तेव्हा वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "अहो बाबुराव, तुम्ही 'नाही' म्हणू नका, 'हो' म्हणा म्हणजे सकारात्मक बोलत चला." त्यावर बाबुराव उदगारले, "नाही, मला तेच म्हणायचे आहे" त्यावर वरिष्ठ चांगलेच भडकले. आणि म्हणाले "अहो तुम्हाला किती वेळा सांगायचे 'नाही' हा शब्द टाळा". तरी बाबुरावांच्या तोंडचा 'नाही' हा शब्द काही टळत नव्हता. यामुळे अन्य अधिकारीही वैतागले.

त्यावर एक सहकारी म्हणाला, "जाऊ द्या ना साहेब, बाबुरावांची कोणाचेही काम होणार नाही अशा अवघड जागी नियुक्ती केली आहे. तेव्हा त्यांची प्रत्येकाचे काम होईलच अशा जागेवर बदली करा म्हणजे त्यांची नकारघंटा आपोआप बंद होईल." त्यावर बाबुराव म्हणाले, "नाही, अगदी बरोबर आहे. साहेब !" त्यांच्या पुन्हा "नाही" या शब्दाने साहेबांनी कपाळावर हात मारून घेतला.

Monday, January 23, 2012

मन

कधी कधी प्रश्न पडतो, मन हे काय असतं? मन हे आपलंच... न दिसणारं प्रतिबिंब असतं. त्यात उन्हाळ्यातील तप्त उन्हाच्या वेदना असतात, पावसाळ्यातील स्वप्नसरी असतात, हिवाळ्यातील आठवणींचा गारवा असतो..... आणि ते असतं तरी केवढं?.. शरीराच्या इंचा दोन इंचाच्या भागात न बसणारं असतं. शरीराचा महत्वाचा भाग हाच असतो. कोणाचं चांगलं, तर कोणाचं वाईट असतं. पण प्रत्येकाला ते चांगलंच वाटत असतं. कधी ते आत्मविश्वास देतं, तर कधी विश्वासघात करतं. त्यात नेहमी काहीतरी शिजत असतं. ते नेहमी भरकटत असतं.

मन कधी घाबरट असतं. मन कधी ताकदवानही असतं. मन कधी कधी चुकतं, आणि चुकत चुकत शिकतं. मनाची बाजू नेहमी जास्त असते; ते अप्रत्यक्षपणे नेहमी चुका करतं. मन हे स्थिर नसतं, मन कधी कधी एकाग्र होत नाही. मन निष्काळजी असतं. मनाला कधी कधी एकटं रहावसं वाटतं. मनाला कधी एकत्र राहावंसं वाटतं, मनाला कधी वाटतं भरपूर पैसा मिळावा. मनाला कधी वाटतं. मनाला कधी वाटतं नेहमी गरीब राहावं, काय करायचं एव्हढा पैसा असल्यावर, मनाला सगळं आयतं हवं असतं. मनाला हवं असणारं पण प्रत्यक्षात, वेगळं झाल्यावर तडजोडही मनच करत असतं. वर्तमान, भूत व भविष्य यात मन नेहमी फिरत असतं.

ह्या विश्वामध्ये निसर्गाने अशी एकच भाषा बनवली आहे, की ती फक्त मनुष्याला स्वतःची, स्वतःला ऐकू येईल. तो कितीही ओरडला तरी ती भाषा कोणाला ऐकू जाणार नाही. ती भाषा म्हणजे मनाची भाषा. ती तेव्हाच समजते जेव्हा शरीर आपले हावभाव स्पष्ट करते आणि ते हावभाव ओळखायलासुद्धा मनच असावे लागते.

मन माझे, माझे अस्तित्व, दाखवून गेले, क्षणार्धात.
मन माझे, माझे स्वप्न, उद्ध्वस्त करून गेले, क्षणार्धात.
मन माझे, जाणिव 'तिची', करून गेले, क्षणार्धात.
मन माझे, माझ्या आठवणी, हसवून गेल्या, क्षणार्धात.
मन माझे, भाषा प्रीतीची, शिकवून गेले, क्षणार्धात.
मन माझे, विखुरलेले, नाते जडून गेले, क्षणार्धात.
मन माझे, क्षितीज नसणारे, माझ्याच जवळ असणारे, क्षणार्धात.
मन माझे, एक फुलपाखरू, उडतसे सारखे, क्षणार्धात.
मन माझे, वाट शोधणारे, न मिळाल्यास स्वतः तयार करणारे, क्षणार्धात.