Wednesday, October 5, 2011

इन्स्पेक्शन

रोजच्यासारखीच प्रार्थना, प्रतिज्ञा झाली आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो पुढल्या आठवडयात शाळेचे इन्स्पेक्शन होतेय तेव्हा मी काय काय सूचना देतो त्या नीट ध्यानात घ्यायच्या..

सूचना क्र. १ - प्रत्येकाने आपापला गृहपाठ पुरा करायचा.

मी ताडकन उभा राहिलो अन म्हणालो गुरुजी.... माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो!
घरी जायचे.. पाठीवरचे दप्तर फेकायचे..
मायीनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपलीतली चतकुर भाकर कोरडीच पोटात ढकलायची.
हातामध्ये इळा घ्यायचा आणि शिवारभर फिरायचे.
माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचे..
तिच्या पोटाला बिलगायचे.. तिच्या पदराआड दडायचे.. आणि चतकुर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी पोटभर रडायचे !!!
तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओठावर ओठ टेकवायची
दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीवाणी माझं पोट तट्ट व्हायचं गुरुजी !!
पुन्हा हातात इळा घेतो आणि शिवारभर कुपाट्यांनी फिरतो
संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्याकुट्या गोळा करत..
पोरं हासली.. मी खाली बसलो..

सूचना क्र. २ - शाळेच्या भिंतींना रंग द्यायचाय. प्रत्येकाने गटागटाने मदत करायची !

मी पुन्हा उभा राहिलो. म्हणालो, गुरुजी कशापायी त्या निर्जीव भिंतींना रंग देताय ?
इथं जित्या माणसांचा रंग टिकत नाही तर भिंतींचे कुठून टिकतील गुरुजी !
माझ्याच माय-बापाचं घ्या ना
माझी नक्षत्रावाणी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून काळी ठिक्कर पडली
आणि दुसऱ्यांचे बोजे वाहताना माझा बाप मेरावरच्या बाभळीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी..
तुम्हाला द्यायचाच असल रंग त्या भिंतींना तर माझं काही म्हणणं नाही..
पण एक सांगून ठेवतो गुरुजी.. त्या काळ्या विठ्ठलाच्या पायावर डोकं आदळून आदळून माझ्या मायबापानं रक्ताचा लाल रंग दिला पण तो विठू कधी पावला नाही.
तर ह्या दोन कवडीच्या रंगानं हा तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी ?

सूचना क्र. ३ - त्या दिवशी प्रत्येकानं नवा युनिफॉर्म घालून यायचं..

माझ्या डोळ्यात पाणी.. मी उभा राहिलो आणि म्हणालो, गुरुजी
माझ्या मायीच्या अंगावरचं लुगडं चार ठिकाणी इरलय..
ते सांधायला धोंदुक मिळालं नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळल ?
गुरुजी म्हणाले, तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये..
मी म्हणालो, गुरुजी.. घरात इस्त्री सुद्धा नाही तेव्हा मास्तर जाम भडकले,
हातामध्ये दप्तर दिले.. पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं..

मी तसाच रडत-रडत घरी गेलो.. मायीला हुडकल.. तिच्या पोटाला बिलगलो..
तिच्या पदराआड दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोटभर रडलो..
पुढं मायीनं पोटाला पीळ देऊन इस्त्री घेऊन दिली ! मायीच्या रक्तानं माझ्या
कपड्यांना इस्त्री करून माझं इन्स्पेक्शन साजरं झालं..
पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं.. गुरुजींचं झालं..
माझं झालं की मायीचं झालं हे तेव्हा कधीच कळलं नाही..

पण आता सारं कळतंय.. मायीच्या पोटातला एक-एक पीळ उलगडतोय..
त्यामुळेच कोपऱ्यात पडलेली तीच इस्त्री मी महिनोंमहिने उचलत नाही.. माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी..
कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात
आणि पहिले दिवस आठवले की, गोठ्यातल्या गायीसारखे
माझे डोळे पुन्हा-पुन्हा पाणवतात........ !!

Saturday, October 1, 2011

स्लॅमबुक

माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात स्लॅमबुक लिहिण्यासारखे दुसरे किचकट काम केले नाही. मुलांची स्लॅमबुक लिहिण्याची त~हाच वेगळी असते. सरळसोट उत्तरं कोणीच देत नाही. नाव, पत्ता, फोन नंबर इथपर्यंत गाडी व्यवस्थित असते. टोपण नाव लिहिण्याची वेळ आली की, छोट्या, गोटया, पिंटू, पिंट्या, चिंट्या या घरगुती नावांपासून सच्या, दिन्या, राक्या, शेख शकील, जाड्या इत्यादी कॉलेजमध्ये फेमस असलेली नावे लिहितात.

यानंतर आवडता,,,, मित्र नाही हो. मैत्रिणीबद्दल ! सर्वात आधी ज्याचं स्लॅमबुक आहे त्याचं नाव लिहिण्याची प्रथा पाळावी लागते. पण आमच्यासारख्यांना मैत्रिणी नाहीत म्हणून जड अंतःकरणाने आडवी रेघोटी मारून ती जागा मोकळी सोडावी लागते.

आयुष्यातील अविस्मरणीय क्षण याबद्दल लिहिण्यासारखे बरेच काही असते. शाळेत कोण्या एके काळी पाटील सरांनी कानाखाली आवाज काढलेला असतो, हेड मास्तरांकडून पालकांना बोलवण्याची चिठ्ठी लिहून घेतली जाते, नाही तर काही प्रेमभंग लिहितात.

आवडता रंग या कॅटेगरीत पर्शियन ब्लू, रॉयल ब्लू पासून चिंतामणी कलर, राणी कलर नाही तर माझ्या मैत्रिणीचा जो आवडता कलर आहे तो इथपर्यंत रंगांची उधळण असते. आवडत्या गाण्यांमध्ये सर्वकाही अलाउड असते.

काय पाळायला आवडतं ? याबद्दल स्वच्छता आणि शांतता असं लिहिण्याऐवजी प्राण्यांचीच नावे लिहितात जसे कुत्रा, मांजर, कोंबडी इत्यादी. आवडता लेखक विल्यम शेक्सपीअर असे लिहावे. (भले मग तुमचे इंग्रजीतील मार्क ४० च्या वर गेले नसतील तरी चालेल.) वाचणाऱ्याला वाटले पाहिजे की आपलं इंग्रजी किती हायफाय आहे ते ! मराठीत गोडी असेल तर अत्रे, देशपांडे, सावंत यांना स्थान द्यावे. आवडती डिश या गटात कारल्याची भाजी, फालुदा, चिकन च्याव च्याव, मटण म्याव म्याव इत्यादी.

पुढे काय व्हायचंय याबद्दल लिहायचं म्हंटल की, आपले फिल्ड सोडून पंतप्रधान, लालू, सिंगर व्हायचंय असं बिनधास्त लिहावे. जर पुढे अदृश्य होऊन जगायची इच्छा असेल तर मिस्टर इंडिया, गायबलेला तुषार कपूर असंच लिहावं. मैत्रीबद्दल अभिप्राय देताना ये शोले की दोस्ती है , याराना बहुत गहरा है वैगेरे थोडसं सेंटी मारून सांगता करावी. शेवटी फोटो चिकटवतांना मोस्ट वॉन्टेडला शोभेल असा फोटो लावावा आणि खाली नेक्स्ट म्हणून स्लॅमबुक बंद करावे.

Wednesday, September 28, 2011

अंतर्बाह्य - ७

* मी जेव्हा चौदा वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील इतके अडाणी होते की त्यांच्याबरोबर माझे खूप कमी वेळा पटायचे. परंतु जेव्हा मी एकोणावीस वर्षाचा झालो, तेव्हा मला याचे आश्चर्य वाटले की, पाच वर्षानंतर ते मला कितीतरी गोष्टी शिकवून गेले होते.

* तुम्ही जर कडयावर उभे नसाल तर, तुम्ही फार जास्त जागा वापरत आहात.

* तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट योग्यच करायची असेल तर; तर तुम्ही फार काही करू शकणार नाही.

* जहाज हे बंदरातच जास्त सुरक्षित असते; पण ते बंदरात उभे करून ठेवण्यासाठी बनवले जात नाही.

* महाविद्यालये म्हणजे अशी ठिकाणे की, जिथे गोटे घासूनपुसून लख्ख केले जातात आणि हिऱ्यांना निस्तेज केले जाते.

* चांगल्या पुस्तकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही किती वाचलीत हे महत्वाचे नाही; तर किती तुमच्या अंतरंगात उतरली, ते महत्वाचे आहे.

* नेता आणि बॉस यांमधील फरक लोक विचारतात. नेता नेतृत्व करतो आणि बॉस 'हाकतो'.

* तज्ज्ञाच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन काम करण्याची हिंमत आपल्यात असायला हवी.

* देवा, माझ्या शत्रूंवर दया कर; कारण मी ती करणार नाही.

* खाली आपटल्यावर तुम्ही उसळी मारून किती उंच जाऊ शकता, ते म्हणजे यश.

अंतर्बाह्य - ६

* चांगला अंदाज बांधण्याची क्षमता अनुभवातून येते आणि अनुभव हा वाईट अंदाजातून येतो.

* तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असायलाच हवे तरच तुम्ही तुमच्या स्पर्धकांना चीत करू शकाल.

* उत्साह ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता आहे. ती पैसा, ताकद आणि प्रभाव यांना मागे टाकते.

* प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्तरित्या समजावून सांगणे शक्य होईल; पण त्यामधून काहीच साध्य होणार नाही. त्याला काही अर्थ नसेल. म्हणजे बीथोवनची सुरावट नागमोडी दाबपट्ट्याचा एक प्रकार म्हणून वर्णिल्यासारखे होईल.

* तो इतका विद्वान होता की, नऊ भाषांमध्ये घोडयाला काय म्हणतात हे तो सांगू शकायचा आणि इतका मूर्ख होता की, स्वार होण्यासाठी त्याने गाढव खरेदी केले.

* कॉलेजच्या पदवीमुळे तुमच्या कानांची लांबी कमी होत नाही तर, ते फक्त झाकले जातात.

* फक्त साहसादरम्यानच काही लोक स्वतःला ओळखण्यात यशस्वी होतात.

* कोणाच्याही मार्गावर मैलभरपर्यंत त्याचे जोडे घालून, थोडेसे चालून बघितल्याशिवाय त्या व्यक्तीवर टीका करू नका. या पद्धतीमुळे तुमचे म्हणणे जरी त्याला पटले नाही, तरी काही हरकत नाही; कारण तुम्ही त्याच्यापासून मैलभर दूर असाल आणि तुमच्याकडे त्याचे जोडेही असतील.

* मुले मोठया माणसांचे कधीही नीट ऐकत नाहीत; पण ती त्यांची नक्कल मात्र पुरेपूर करतात.

* मला टी. व्ही. हे फार चांगले शैक्षणिक मध्यम वाटते. ज्या क्षणी घरातील कोणी टी.व्ही. सुरु करतो, त्या क्षणी मी लगेच एखादे पुस्तक घेऊन वाचत बसतो.

अंतर्बाह्य - ५

* कधी कधी एक घटना तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकू शकते.

* वाचन हा प्रेरणेचा आणि शिकण्याचा स्त्रोत होऊ शकतो.

* सृजनशीलता हा व्यक्ती स्वातंत्र्याचा परिमल आहे.

* विद्वान लोक हे काही नव्या कल्पनेमुळे पुढे जात नाहीत किंवा प्रेरित होत नाहीत; तर आधी सांगितलेल्या गोष्टी पुरेशा नाहीत, या कल्पनेचेच त्यांना वेड असते.

* चोरसुद्धा चोऱ्या करताना कल्पकता वापरतात. धूर्त, युक्तीबाज लोकही खूपच सृजनशील आणि कल्पक असतात; खरे तर सर्वाधिक. ते सुरक्षा व्यवस्थेतील कच्चा दुवा शोधून काढतात, जो त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनाही माहित नसतो.

* ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही, असे आपल्याला वाटते; त्याच आपण केल्या पाहिजेत.

* तुम्हाला जर तुम्ही अचूक असण्याची काळजी नसेल, तर बुद्धिमान होणे सोपे असते.

* अचूक आणि जवळजवळ योग्य शब्द यांमधील फरक म्हणजे वीज आणि काजवा यांतील फरक.

* स्वतःचा अभिमान आणि अहंकार जे पुन:पुन्हा पणाला लावू शकतात, ते अशा गोष्टी करू शकतात, ज्या करण्याची इतरांना गरज वाटत नाही.

* मला एकच गोष्ट माहित आहे की, मला काहीही माहित नाही.

अंतर्बाह्य - ४

* बुद्धीमत्तेचे खरे लक्षण म्हणजे दोन परस्परविरुद्ध कल्पना एकाच वेळी डोक्यात घोळवता येण्याची क्षमता.

* प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाला जबाबदार धरता येणार नाही.

* जो कोणी म्हणतो की, त्याला विचार दिसत नाहीत; त्याला ती कलाच माहित नाही.

* आपले छंद फिनिक्स पक्ष्यासारखे असतात; जुना जळून जातो, तेव्हा राखेतून नवीन उत्पन्न होतो.

* मला संगीताबद्दल काहीही कळत नाही. माझ्या क्षेत्रात त्याची गरजही नाही.

* औपचारिक शिक्षणापेक्षा व्यवहारज्ञान जास्त महत्वाचे असते.

* संगीत ही एकच अशी भाषा आहे, ज्यामध्ये तुम्ही हीन किंवा मर्मभेदी गोष्टी बोलू शकत नाही.

* मरणाला घाबरूनही त्यावर स्वार होणे .... म्हणजेच हिंमत.

* मला कोणतीही दैवी देणगी नाही. मी फक्त वेडयासारखा चौकस आहे.

* हस्तीदंती मनोऱ्यात बसून कोणालाही उपयोगी नसलेल्या गोष्टींचे शोध लावू नये.

अंतर्बाह्य - ३

* माझ्यासाठी पैसा कधीच महत्वाचा नव्हता. पैसा हा फक्त मोजमाप करण्याचा सुलभ मार्ग आहे.

* तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, याच्याशी मला काही देणेघेणे नाही.

* जर एखादी गोष्ट मानवाच्या आवाक्यात असेल, तर ती तुमच्याही आवाक्यात आहेच.

* बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही तुमचे पर्याय मर्यादित ठेवता, तेव्हा तुम्हाला योग्य संधी सहजासहजी मिळत नाही.

* रोजच्या कामाच्या धबगडयातही आपल्याला कधीकधी वाटायला लागते की आपण करतो आहेत, ते काम रटाळ आणि निरर्थक आहे.

* छान वाटण्यासाठी कारण असायलाच हवे, असे नाही; विनाकारणही तुम्हाला छान वाटू शकते.

* एखाद्या गोष्टीत गुंतून जाणे, हा स्वभावधर्म आहे; परंतु सजग प्रयत्न करून तो वाढवताही येतो.

* आपल्या प्रत्येकाकडे सदविवेकबुद्धी असते. तिच्याविरुद्ध न जाणे हे कधीही शहाणपणाचे असते.

* छंद हा तणावमुक्तीचा एक उत्तम मार्ग आहे आणि यातून पैसा नाही मिळाला, तरी आनंद आणि समाधान नक्की मिळू शकते. हीसुद्धा शक्यता आहे की, अचानक कधीतरी तुमचा छंद हा पैसे मिळवण्याच्या उद्योगाशी जुळेल आणि कदाचित एक दिवस तुमचा पूर्ण वेळचा उद्योग बनेल.

* जीवनाबद्दल तुमचे स्वतःचे तत्वज्ञान असू द्या.

अंतर्बाह्य - २

* तुम्हाला जर लेखन करायला आवडत असेल तर फक्त कल्पनारम्य साहित्यच तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल; रॉकेट सायन्स वरील पुस्तके नव्हे. कारण साहित्य सगळे वाचतात, पण रॉकेट सायन्स मोजकेच लोक वाचतात.

* आयुष्यातील रहस्यांपैकी एक म्हणजे अडथळ्यांनाच पाऊलवाटेचे दगड बनवणे.

* आपल्या झपाटलेपणाला जर आपण विरोध करत असू , तर तो आपण आपल्या ताकदीतून नव्हे, तर कमतरतेतून करतो.


* जर लग्नापूर्वी प्रेम निषिद्ध नसेल तर, प्रेमात पडण्यापूर्वीची एक पायरी म्हणून फ़्लर्टिन्गकडे बघायला हवे.

* जो तुम्हाला तुमचा ध्यास शोधण्यास मदत करेल, असा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे, प्रयोग करण्याची मनोवृत्ती.

* तुमच्या हृदयाच्या प्रतिसादाकडे फार गांभीर्याने बघू नका; तो तुम्हाला तसा मिळणार नाही. सहज राहा, प्रवाही राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, स्वतःला जे मिळवायचे आहे, त्यासाठी थोडा वेळ मोकळा ठेवा.

* ज्या स्त्रियांना घर सजवण्याची कला येत होती, त्यांनी स्वतःला थोडे प्रोत्साहन दिले आणि त्या यशस्वी इंटीरिअर डिझायनर बनल्या.

* मला जर चांगल्या वादकांबरोबर वाजवायला मिळाले, तर मी रात्रभर ड्रम वाजवू शकतो -- अगदी मोफत !

* बहुतांश विनोदवीरांना लहानपणापासूनच विनोदबुद्धी असते आणि ते त्यांचे हे कौशल्य फुलवतात आणि यशस्वी व्यवसाय करतात. ते जगाला हसवतात आणि जगासाठी काहीतरी सकारात्मक करतात.

* दुर्दैवाने जगभरात कुठेच राजकारण्यांना देशभक्तीतून प्रोत्साहन मिळत नाही! आणि ही वस्तुस्थिती आहे.

Tuesday, September 27, 2011

अंतर्बाह्य - १

* आपण गोष्टींकडे त्या जशा आहेत, तसे बघत नाही; तर आपण जसे आहोत, तसे बघतो.

* एका दिमाखदार बीने प्रत्येक फुलावर टीका केली आणि एका उन्हाळ्यात तिच्या लक्षात आले, की स्वतःच एक तण आहे.

* तुम्हाला कधी काय धडकेल, ते सांगता येत नाही. बंदुकीची गोळी हा सर्वांत उत्तम प्रकार आहे.

* माणसाचे जीवन पूर्णपणे उद्विग्न आणि कंटाळवाणे होऊ नये म्हणून गुरूने बुद्धीपेक्षा जास्त ध्यास बहाल केला आहे. महत्वाचे म्हणजे, त्याने बुद्धीला जागा दिली, ती डोक्याच्या एका कोपऱ्यात आणि उरलेले पूर्ण शरीर ध्यासाला बहाल केले.

* जगातील सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे माणसाचे पेटलेले मन.

* मी जेव्हा जेव्हा निराश होतो, तेव्हा तेव्हा मुलभूत गोष्टींकडे परत जातो. मी स्वतःलाच प्रश्न विचारतो, "मी हे का करतो आहे?" त्याचे उत्तर येते - ध्यास.

* नादिष्ट असल्याखेरीज कोणीही जग बदलू शकत नाही.

* झपाटलेपणा हा चुकीचा नियंत्रक असला, तरी उंच उडी घेण्यास उपयुक्त अशी स्प्रिंगही आहे.

* सामान्य ज्ञान हे असे आहे, ज्याच्यावर मुर्खांचा अधिकार आहे. तपशीलवार वर्णन करणे म्हणजे एखाद्या विषयात विशेष पात्रता मिळवणे.

* तुम्हाला दरवेळी सगळ्याच गोष्टी आवडतील, हे शक्य नाही; पण तुम्हाला बहुतेक वेळा काही गोष्टी आवडू शकतील.


Saturday, August 27, 2011

ऋणानुबंध

माणसाचे आयुष्य म्हणजे अनेक नात्यांची गुंफण! प्रत्येक नात्याचे कर्तव्य वेगळे आणि अधिकारही वेगळे!
त्यातली काही नाती नाजूक व हवीहवीशी वाटणारी! तर काही नाती कर्तव्य म्हणून पार पाडली जाणारी. या नात्यांमध्ये माणसाचं जीवन विभागलेलं! पण रक्ताच्या सर्व नात्यांइतकच जवळचं वाटणारं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान असणारं नातं म्हणजे मैत्रीचं..!

खरंच मैत्रीचा उदय म्हणजे एक नित्य नवा अनुभव आहे. हृदयाच्या मंदिरात, भावनेच्या जलावर, प्रेमाच्या वेलीवर सदैव फुलणारे फुल म्हणजे मैत्री होय. किती सहज आणि सोप्या शब्दात मैत्रीचा खरा अर्थ आपणास अनुभवास मिळतो. आपण मैत्री करतो, पण ती कुठपर्यंत निभावतो; कारण नुसतं मैत्री करून चालत नाही, तर त्या मैत्रीत असणारी निरागसता जपावी लागते. मैत्री हे एक फुल आहे. त्या फुलाच्या पाकळ्या जितक्या फुलवाव्या तितक्या फुलतात; पण त्या फुलाच्या पाकळ्या पडू न देणं हे खऱ्या मैत्रीचं लक्षण आहे.

मैत्री ही कशी, कोणाशी होईल ते सांगता येत नाही. मैत्री ही निरागस, निस्वार्थी असावी. तिला स्वार्थ या शब्दाची सांगड नसावी. नाही तर ती जितक्या लवकर जुळते, तितक्या लवकर तुटते सुद्धा. अंधाराच्या उगमासाठी प्रकाशाची पूजा करावी लागते. तसेच मैत्रीत भावनेची पूजा करावी लागते. मैत्रीत जे सर्व देता येईल ते द्यावं आणि जे घेता येईल ते घ्यावं. मैत्रीत सर्व काही दिले तरी सर्व काही आपल्याजवळ उरते. कारण मैत्रीत फक्त देहात फरक असतो. मनात फरक नसतो. आपल्या मैत्रीत विश्वास असावा आणि तोही दगडांमधून वाहणाऱ्या, खळखळणाऱ्या झऱ्यासारखा.

एकमेकांवर असलेली मायेची खात्री म्हणजे आपली खरी मैत्री.. मैत्रीत वादविवाद असावेत. पण गैरसमज नसावेत. वादविवादाने मैत्रीत एक प्रकारची ओढ निर्माण होते आणि मैत्री आणखीनच घट्ट होण्यास मदत होते. मैत्रीत भावनांची कदर करावी. उणे-दुणे, राग, तिरस्कार सारख्या शब्दांना मैत्रीत थारा नसावा.

दुःखात मनात सावरणारं आणि सुखात सहभागी होणारं, अडचणींमध्ये दिशादर्शन करणारं, तर आवेगाला वेळीच भान आणून देणारं मैत्र आपल्याला अपेक्षित असतं. या सगळ्याच बाबी एकाच व्यक्तीमध्ये पूर्णांशाने असतात, असं नाही; तरीही त्यातल्या अन्य बाबी एका सुहृद मनाला कुठेतरी त्या मैत्रीशी बांधून ठेवीत असतात.

अशी ही मनाच्या कप्प्यात जपून ठेवावी अशी मैत्री. शब्दशब्दाने, स्नेहाच्या भावनेने फुललेली, मोहरलेली, निखळ आनंदाचा झरा असलेली मैत्री चिरंतन बहरत राहावी..

शिंग फुटले का?

आपण शाळेतल्या त्या बंदिस्त वातावरणातून कॉलेज नावाच्या स्वतंत्र आणि मोकाट नवविश्वात पदार्पण करण्या अगोदर अथवा नंतर आपल्या वागण्यात जे अमुलाग्र बदल होतात याला आपले पालक किंवा ज्यांनी कॉलेजचे तोंड कधी पाहिले नाही असे लोकं "शिंग फुटणे" म्हणतात.

आता हे अमुलाग्र बदल कोणते की ज्यामुळे आपल्याला "शिंग फुटले" हे उठता बसता ऐकावे लागते, तर एखादा शेंबडा, शेळपट, गचाळ, शाळेचा गणवेश ही धड न घालणारा मुलगा कॉलेजला मात्र अगदी शिनेमातल्या हिरो प्रमाणे राहायला लागतो. सोल्जर कट (एकदम बारीक केस) हा स्पाय कट किंवा जॉन सारख्या हिप्पी कट मध्ये परावर्तीत होतो, एखादा जन (पूर्वीच्या) अजय देवगण सारखा शायनिंग, तोंडाने वर फुक मारत केसांचा पल्ला उडवत चालतो, शाळेत कधीही वेळेवर न येणारा मुलगा कॉलेजला मात्र एखाद तास अगोदरच येऊन बसतो (अर्थात हिरवळ पाहायला), शाळेत पूर्वसूचना देऊन रजा राहणारा मुलगा खुशाल बंक मारून पार्किंग अथवा कट्ट्यावर टवाळक्या करतो आणि त्याची कारण पण लई इन्टरेष्टिंग असतात. कुणी म्हणत आज जाम कंटाळा आलाय, कुणी म्हणत घरी जायचंय, कुणी म्हणत भेटायला जायचंय ( कुणाला ते...... हा कॉमनसेन्सचा भाग झाला) आणि मग शाळेच्या टायमाला मनातच दडून बसलेले क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल वरचे प्रेम एकदम उफाळून येते.

शाळेत तासाला कधीही चॉकलेट न खाणारा कॉलेज मध्ये लेक्चरला पाच्याक पाच्याक च्युइंगम चावत असतो, शाळेत नेहमी डब्बा नेणाऱ्या मुलाला क्यानटीन मधले पंच-पक्वान्न (मिसळ, पाव, कांदा, लिंबू, पापड) इतकी आवडायला लागतात की रीसेस ची वाट न पाहताच भूक शमवायची गरज भासते ( अर्थात ती भूक कॉलेज संपेपर्यंत नाही शमत)

कॉलेजच्या काळात कट्टा म्हणजे मुलाला आपल्या "जान" पेक्षा प्राणप्रिय असतो (ही "जान" कट्ट्यानेच दिलेली असते........ एक सोडून गेली तरी दुसरीची सोय इथूनच करणार) . कट्ट्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आलेल्या गेलेल्या पोरा-पोरींवर लक्ष ठेवता येत. मोठ्या मेहनतीने पैसे जमा करून शिनेमा पाहायला जातात ( काही वेळेस 'आमसुली' शिनेमे बघण्याची तीव्र कळ पण कट्ट्यावरच येते )

याच कट्ट्यावर यक से यक गवय्ये होतात. कधी बाथरूम मध्ये न गाणारा मुलगा बी पोरगी दिसल्यावर वरच्या पट्टीत रियाज सुरु करतो आणि पोरीने मागे वळून पाहिले तर ( खुन्नस ने) 'तो मी नव्हेच' अश्या अविर्भावात सात्विक भाव चेहेऱ्यावर आणून सोज्वळ मुलाप्रमाणे वर्तन करतो ( प्रेमात बघितले तर इचारायलाच नको पोरगा जमिनीपासून ७-८ फुट वर) म्हणजे अभिनय शिकण्याचे वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

कधीही स्वतः कडे न बघणारी (शाळेत असताना) पोट्टी जाता-येता आरश्यात बघण्यात, मखडन्यातच व्यग्र दिसते (कट्ट्यावर बसणारी पोरे आपल्यालाच बघून नाय ना हसत? असं बघत असतात). कॉलेज मध्ये आल्यावर जिम, हेल्थ क्लब लावण्याची फ्याशन जोर धरते ( पोरींचा काही दुसरा हेतू असेल तर विचारू नका)

आपले संपूर्ण आयुष्य कॉलेजच्या पाच वर्षातच जगण्याचे, थोडक्यात एन्जॉय करण्याचे जे खट्याळ प्रयत्न केले जातात त्यालाच शिक्षक, पोर-पोरी, पालक लोकं "शिंग फुटली का?" असे संबोधतात.